लोकमान्यांनी दिला स्वराज्याचा मंत्र, मोदी-शहा भारताला देत आहेत सुरक्षेचा मंत्र; एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून कौतुक

पुणे: लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जगाला सुरक्षेचा मंत्र देत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्यानंतर ते बोलत होते.

शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि त्यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला अभिवादन करत अजित डोवाल यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव केला. “अजित डोवाल हे नावच पुरेसे आहे. महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्यावतीने त्यांचे अभिनंदन करतो,” असे ते म्हणाले.

अमित शहा यांच्या हस्ते डोवाल यांचा सन्मान हा “दुग्धशर्करा योग” असल्याचे सांगत शिंदे यांनी अंतर्गत सुरक्षा आणि सीमासुरक्षेसाठी दोघांच्या योगदानाचे कौतुक केले. लोकमान्य टिळकांनी उभारलेल्या गुप्त माहितीच्या जाळ्याचा उल्लेख करत त्यांनी आधुनिक भारतातील गुप्तचर व्यवस्थेचा वारसा अजित डोवाल यांनी समर्थपणे पुढे नेल्याचे सांगितले.

डोवाल यांच्या सुवर्ण मंदिरातील कारवाया, दहशतवादविरोधी मोहिमा आणि पाकिस्तानमध्ये सात वर्षे अंडरकव्हर एजंट म्हणून केलेल्या कार्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, “राष्ट्र प्रथम” हा त्यांचा जीवनमंत्र असून ते भारताचे खरे धुरंधर रणनीतीकार आहेत.

मोदी-शहा यांच्या नेतृत्वामुळे भारत अधिक सुरक्षित, सक्षम आणि आत्मविश्वासी राष्ट्र बनल्याचे सांगत शिंदे यांनी लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या विचाराला आज सुरक्षित आणि विकसित भारताच्या संकल्पनेतून नवे बळ मिळत असल्याचे नमूद केले. देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या सर्व सुरक्षा दल, अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, डॉ. रोहित टिळक, उदय सामंत, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत