तोकडे कपडे घालून आली बाप्पाच्या दर्शनाला, मग मंडळाने काय केलं ते पाहा…

महाराष्ट्र

मुंबई: यंदाचा गणेशोत्सव चांगलाच धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. कोरोनाच्या तब्बल 2 वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने बाप्पाच्या दर्शनाची सर्वांनाच उत्कंठा आहे. यंदा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईतील सिने कलाकार देखील घराबाहेर पडताना पाहायला मिळत आहेत.

सिने कलाकार एखाद्या मंडळात गेले की तिथे त्यांचा सत्कार, शाल, श्रीफळ देण्याचा कार्यक्रम होतो. मात्र एका गायिकेला मंडळाने सत्कार म्हणून नव्हे तर अंग झाकण्यासाठी शाल दिली. ही घटना मुंबईतील अंधेरीचा राजा गणपती मंडळाची आहे. या गणेश मंडळात गायिका लिझा मिश्रा बाप्पाच्या दर्शनाला पोहोचली. मात्र बाप्पाच्या दर्शनाला जाताना तिने तोकडे कपडे घातल्याने मंडळाने तिला शाल गुंडाळायला दिली.

मुंबईत भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनाला येताना शरीर झाकेल एवढे कपडे परिधान करावेत हा मंडळाचा नियम आहे. मात्र लिझाने हा घालून दिलेला नियम मोडल्याने मंडळाकडून तिला रोखण्यात आलं आणि तिला शाल देण्यात आली. मंडळाकडून लिझाला शाल दिली दिली गेल्यानंतर तिने ती लुंगीसारखी बांधून गणरायाचं दर्शन घेतलं. दरम्यान, आता लिझाचे लुंगीसारखी शाल ओढलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.