औरंगाबाद नव्हे तर छत्रपती संभाजीनगरच…

महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली…

औरंगाबाद: संभाजीनगर शहाराच्या नामांतराला विरोध करणाऱ्यांना अखेर सुप्रीम कोर्टाकडूनही फटकारलं असून नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगर नामांतरावाचा ठराव मंजूर केल्यानंतर नुकतीच केंद्र सरकारनेही या प्रक्रियेला मंजुरी दिली. त्यानंतर नामांतरविरोधी संघटनांनी याविरोधात कायदेशीर लढा देण्याचा निश्चय केला होता. नामांतराला आक्षेप घेणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. आज अखेर ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे नामांतरविरोधी संघटनांसाठी ही मोठी चपराक समजली जात आहे.

सुप्रीम कोर्टातील नामांतरविरोधातील याचिका फेटाळण्यात आल्यानंतर आता नामांतरविरोधातील संघटना आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा मतदार संघाचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात संभाजीनगर नामांतराविरोधात आंदोलन सुरु करण्यात आलं होतं. मात्र त्याला विरोध म्हणून हिंदु संघटनांनीही शक्तिप्रदर्शन करायला सुरुवात केली होती.

त्यानंतर शहरातील वातावरण अधिक संवेदनशील होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे आपण आंदोलन मागे घेत असून कायदेशीर लढाई सुरुच ठेवणार, अशी घोषणा खा. जलील यांनी केली होती. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता रहावी, याकरिता आंदोलन मागे घेण्यात आल्याचं खा. जलील म्हणाले. आता आजच्या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, हे पहावं लागेल.