प्राचीन बौद्ध लेणी परिसरात भू-माफियांकडून अवैध उत्खनन, महसूल प्रशासनाच्या अभयामुळे ऐतिहासिक स्थळ धोक्यात!

महाराष्ट्र

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी आणि संरक्षित गुंफा परिसरात भू-माफियांकडून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विजय वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा प्रश्न उपस्थित करत, संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर आणि भू-माफियांवर कठोर कारवाईची मागणी केली.

बुद्ध लेणी बचाव कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेत वडेट्टीवार यांनी सांगितले की, पहाडसिंगपुरा परिसरातील प्राचीन बौद्ध लेणी तसेच हरसूल तलावापर्यंतच्या गायरान जमिनीवर मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने अहोरात्र मुरुम व मातीचे अवैध उत्खनन सुरू आहे. यामुळे पुरातत्त्वदृष्ट्या अत्यंत संवेदनशील टेकड्या आणि लेणींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.

मागील एक वर्षापासून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार स्तरावरील अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाकडून केवळ नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पडत असले, तरी प्रत्यक्षात दंडात्मक वसुली किंवा ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. रॉयल्टी चोरी आणि दंडात्मक कारवाईबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

याचबरोबर गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अवैध उत्खनन करणाऱ्या भू-माफियांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात अवैध उत्खननाविरोधात किती वाहनांवर कारवाई केली आणि किती दंड प्रत्यक्ष वसूल केला, याचा सविस्तर अहवाल विधानसभेसमोर सादर करावा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.