जनतेच्या दारी शासन! ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाची मुंबईत प्रभावी अंमलबजावणी

महाराष्ट्र

मुंबई: जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाच्या (टप्पा-१) मुख्य उद्देश असून, या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.

या अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक नियोजन भवन येथे पार पडली. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, महेश हरिश्चंद्रे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले की, ७ मार्च, १४ मार्च, १० एप्रिल, ८ मे आणि १४ मे रोजी या अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून १५ प्रकारच्या सेवांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार असून प्रत्येक विभागाने सोपविलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.

शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले शाळेतच उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दाखल्यांबाबत माहिती देण्यासाठी मुख्याध्यापकांची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शासकीय कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज व निवेदने वेळेत निकाली काढावीत. शासनाने प्रत्येक कामासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून दिली असल्याने कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. प्रलंबित प्रकरणे आढळल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या अभियानांतर्गत फेरफार प्रकरणे, भूमी अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रे, अधिकार अभिलेख अद्ययावत करणे आदी सेवा तत्काळ उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, मिशन वात्सल्य यांसह विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.