इराण-इस्रायल तणावाचा फटका; खाद्यतेल दरात मोठी उसळी, गुढीपाडवा ठरणार महाग

महाराष्ट्र

इराण: आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत चाललेल्या इराण-इस्रायल तणावाचा थेट परिणाम आता भारतातील बाजारपेठांवर दिसू लागला आहे. आयात साखळी विस्कळीत झाल्याने खाद्यतेलाच्या दरात गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली असून, सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचा बजेट बिघडण्याची चिन्हे आहेत.

सध्या खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो १३ ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. विशेषतः सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही वाढ अधिकच जाणवत आहे.

मुंबई-पुण्यात दरवाढ स्पष्ट

मुंबई आणि पुण्यातील बाजारपेठांमध्येही दरवाढीचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे.

२८ फेब्रुवारीपर्यंत ₹१६० प्रति किलो असलेले सूर्यफूल तेल आता ₹१७३ पर्यंत पोहोचले आहे. सूर्यफूल तेलाचा तुटवडा निर्माण झाल्याने सोयाबीन तेलाच्या मागणीत वाढ झाली असून त्याचे दरही वाढले आहेत.

घाऊक बाजारात १५ किलोच्या डब्यामागे ₹३० ते ₹४० वाढ झाली आहे. मुंबईतील एपीएमसी (वाशी) बाजारात घाऊक दरात १० ते १२ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. तर पुणे मार्केट यार्डात बाहेरील राज्यांतून येणारी आवक घटल्याने तेलाचे दर अधिक वाढले आहेत.

राज्यातील प्रमुख दर (अंदाजे)

खाद्यतेल

दर (प्रति लिटर/किलो)

सूर्यफूल तेल

₹१७३ – ₹१७८

सोयाबीन तेल

₹१५३ – ₹१५९

शेंगदाणा तेल

₹१९० – ₹१९४

पाम तेल

₹१४५ – ₹१४८

मोहरी तेल

₹२०० – ₹२०४

महागाईचा दुहेरी फटका

खाद्यतेलासोबतच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीतही वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक (WPI) २.१३ टक्क्यांवर पोहोचला असून, हा ११ महिन्यांतील उच्चांक आहे.

कोकणातील हापूस आंब्याची मर्यादित आवक, बासमती तांदळाच्या दरात वाढ (₹५ प्रति किलो) आणि साबुदाण्याच्या किंमतीतील वाढ यामुळे सर्वसामान्यांचा खर्च वाढत आहे. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा अधिक खर्चिक ठरण्याची शक्यता आहे.

दरवाढीची कारणे

इराण-इस्रायल तणावामुळे क्रूड ऑईल व वाहतूक खर्चात वाढ

आयात साखळी विस्कळीत

बंदरांवर माल अडकणे किंवा परत जाणे

किरकोळ बाजारात मर्यादित साठा

सणासुदीमुळे मागणीत १०–१५% वाढ

जागतिक घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर होत असून, येत्या काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.