‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’द्वारे एमएसएमई निर्यातीला नवी चालना

महाराष्ट्र

मुंबईत दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा

मुंबई: राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राची कार्यक्षमता व उत्पादकता वाढवून उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’ अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) व निर्यात प्रचालन उपक्रमांच्या माध्यमातून निर्यातवृद्धीस चालना देण्यावर या उपक्रमात विशेष भर राहणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ही कार्यशाळा 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत एमएसएमई विकास व सुविधा कार्यालय, साकीनाका येथे होणार असून, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निर्यात प्रचालन समिती, मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली ती पार पडणार आहे.

त्याचप्रमाणे मुंबई शहर जिल्ह्यासाठी कार्यशाळा 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निर्यात प्रचालन समिती, मुंबई शहर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या कार्यशाळांमध्ये राज्य व केंद्र शासनाच्या विविध उद्योगविषयक योजना, उपक्रम, अनुदाने, निर्यात संधी, तसेच रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती याबाबत सविस्तर माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मुंबई शहर व उपनगरातील सर्व शासकीय कार्यालये, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, उद्योग समूह, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना यांचे लाभार्थी, निर्यातदार तसेच उदयोन्मुख उद्योजकांनी या कार्यशाळांना उपस्थित राहावे, असे आवाहन उद्योग सहसंचालक, मुंबई प्राधिकरण विभाग, चेंबूर यांनी केले आहे.

मर्यादित बैठक व्यवस्थेमुळे इच्छुकांनी didicmumbai@gmail.com या ई-मेलवर किंवा दिलेल्या लिंकवर नोंदणी करून उपस्थिती निश्चित करावी.

https://forms.gle/nmB97ostLrz9e3No9