खुशखबर! रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता शहरात लवकरच धावणार मेट्रो…

महाराष्ट्र
औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील वाढती लोकसंख्या आणि जालना रोडवरील होणारी वाहतूक कोंडी पाहता शेंद्रा ते वाळूज एमआयडीसी असा अखंड 25 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिलमध्ये केली होती. त्यामुळे याच प्रकल्पात साडेआठ किमी अंतराचा डबल डेकर उड्डाणपूल उभारुन त्यावर मेट्रो सेवा सुरु करण्याचे नियोजन महामेट्रोकडून करण्यात आले होते
दरम्यान, भागवत कराड यांनी घेतलेल्या पुढाकाराने अखेर महामेट्रो कंपनीने औरंगाबाद शहरातील पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गाचा डीपीआरचे काम पूर्ण केले असून या डीपीआर नुसार या मेट्रो रेल्वे मार्गासाठी एकूण 6 हजार 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उद्या सोमवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर डीपीआर सादर केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील विकासात भर…
आशिया खंडात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहर म्हणून औरंगाबादची ओळख असून शहरात मेट्रो रेल्वे सुरु झाल्यास यामुळे विकासात भर पडणार आहे. वाळूज ते शेंद्रा असा मोठा अंतर मेट्रोमुळे काही मिनटात पार करता येईल. तर नव्याने विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीपर्यंतचा प्रवास देखील सोपा होणार आहे.
वाळूज एमआयडीसी आणि डीएमआयसी एकेमकांना जोडणार…
वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसी असा अखंड 25 किलोमीटरचा उड्डाणपूल तयार झाल्यास याचा मोठा फायदा उद्योजकांना होणार आहे. कारण जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी समजल्या जाणारे वाळूज शहर आणि शेंद्रा एमआयडीसीसोबतच नव्याने तयार होत असलेल्या डीएमआयसीचा प्रवास सोपा होणार आहे. त्यामुळे दोन्ही महत्वाच्या एमआयडीसी एकेमकांना जोडल्या जातील. यामुळे उद्योजकांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. सोबतच मेट्रो रेल्वेचा देखील प्रवाशांना फायदा होईल.