महायुतीचा धडाका! मुंबईत महापौर आमचाच; एकनाथ शिंदे

महाराष्ट्र राजकीय

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर; भावनिक राजकारणाला नकार

ठाणे: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, राज्यातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीचेच महापौर होतील, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

ठाणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, ठाणे, कल्याण–डोंबिवली, संपूर्ण एमएमआर आणि मुंबईत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून, मुंबईतही शिवसेना–भाजप महायुतीचाच महापौर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीदरम्यान भावनिक मुद्दे, आरोप-प्रत्यारोप झाले असले, तरी मतदारांनी भावनांपेक्षा विकासालाच कौल दिला आहे. विकासविरोधी भूमिका घेणाऱ्यांना जनतेने नाकारले असून, ‘विकास हाच खरा ब्रँड’ असल्याचे मुंबईकरांनी स्पष्ट केले, असे शिंदे म्हणाले.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिकेत महायुती अशी ट्रिपल इंजिन सरकार व्यवस्था मुंबईच्या विकासाला गती देईल, असे त्यांनी सांगितले. मुंबईला जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील विकासकामांचा आढावा देताना त्यांनी सांगितले की, पुढील वर्षी मेपर्यंत प्रमुख रस्ते काँक्रीटचे करण्यात येतील. सात ठिकाणी एसटीपी प्रकल्प, मेट्रो २ व ३, पॉड टॅक्सी, गोरेगाव–मुलुंड लिंक रोड, बोरिवली टनेल व रिंग रोड प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल.आरोग्य, स्वच्छता व पुनर्विकासावर विशेष भर देण्यात येत असून, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, रुग्णालयांचे आधुनिकीकरण आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यात आली असल्याचे शिंदे म्हणाले.

“सत्ता नव्हे, तर मुंबईकरांच्या जीवनात बदल घडवणे हेच आमचे ध्येय आहे,” असे सांगत त्यांनी लाडक्या बहिणींच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानले. आमचा अजेंडा स्पष्ट आहे – विकास, विकास आणि विकास, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले.पत्रकार परिषदेला खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सौ. मीनाक्षी शिंदे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.