दागिने हिसकावण्याच्या घटना वाढल्या; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महाराष्ट्र

सांगली: सांगली शहरासह उपनगरांत घराच्या दरवाजावर थाप मारून किंवा बेल वाजवून दार उघडताच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. सकाळी–सायंकाळी फिरायला बाहेर पडलेल्या महिलांनाही लक्ष्य केले जात आहे. ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या चोरींची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे.

दार उघडण्यापूर्वी खात्री करा

बेल वाजल्यानंतर बाहेर कोण आहे, व्यक्ती ओळखीची आहे का, याची खात्री करूनच दरवाजा उघडावा. घाईत किंवा निष्काळजीपणाने दार उघडणे धोकादायक ठरू शकते.

दरवाजाला लेन्स आहे का?

दरवाजाच्या मध्यभागी बसवलेली लेन्स (डोअर व्ह्यूअर) उपयुक्त ठरते. बेल वाजल्यानंतर लेन्समधून बाहेर उभ्या व्यक्तीची ओळख पटवता येते. लेन्स नसल्यास सेफ्टी चेन लावून फटीतून पाहावे. शक्य असल्यास चॅनल गेट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणेही सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते.

रात्री विशेष खबरदारी

रात्री-अपरात्री दरवाजा वाजल्यास प्रथम लेन्स किंवा खिडकीतून पाहावे. ओळख पटल्याशिवाय दरवाजा पूर्ण उघडू नये. शंका असल्यास शेजाऱ्यांची मदत घ्यावी.

संकटात ११२ डायल करा

अनोळखी व्यक्ती संशयास्पद वाटल्यास तात्काळ ११२ वर कॉल करून मदत मागावी. स्थानिक पोलिस ठाण्याचा संपर्क क्रमांक जवळ ठेवणेही आवश्यक आहे.सतर्कता हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.