भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने, महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने; देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

मुंबई: भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने, तर महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला विविध देशांचे महावाणिज्यदूत, राजनैतिक अधिकारी, वाणिज्यदूत, विविध देशांचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारताच्या विकासाचा आढावा घेताना सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि जागतिक घडामोडींमध्ये निर्णायक भूमिका बजावणारा देश म्हणून उदयास येत आहे. भारताने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले असून लवकरच पाच ट्रिलियन डॉलरपेक्षा मोठ्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या दशकात भारताने गरिबी निर्मूलन, पायाभूत सुविधा, नवकल्पना, तंत्रज्ञान आणि मानव संसाधन विकासाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. भारतीय प्रतिभेने देशाबरोबरच जागतिक उद्योगविश्वालाही दिशा दिली असून भारत विकासाचे नवे मानदंड निर्माण करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचे शक्तिकेंद्र

महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे शक्तिकेंद्र असल्याचे सांगताना फडणवीस यांनी राज्याच्या औद्योगिक, तांत्रिक आणि नवोन्मेष क्षेत्रातील आघाडीवर भर दिला. महाराष्ट्र उत्पादन क्षेत्रातील अग्रणी राज्य, तंत्रज्ञान केंद्र, स्टार्टअपसाठी महत्त्वाचे केंद्र आणि गुंतवणुकीचे प्रमुख आकर्षण बनले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई ही आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असण्यासोबतच जागतिक गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे. मुंबई आणि नवी मुंबई परिसर देशाची डेटा सेंटर राजधानी म्हणूनही विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाढवण बंदरामुळे महाराष्ट्राच्या सागरी सामर्थ्याला बळ

वाढवण बंदराचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प भारताच्या सागरी सामर्थ्याला नवी दिशा देणारा ठरेल. जवाहरलाल नेहरू बंदरापेक्षा वाढवण बंदर तीनपट मोठे असेल आणि भविष्यात जगातील अव्वल दहा बंदरांमध्ये त्याचा समावेश होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात ‘तिसरी मुंबई’ आकार घेत असून एज्युकेशन सिटी, मेडी सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी, जीसीसी सिटी आणि नव्या व्यावसायिक जिल्ह्यांच्या माध्यमातून जागतिक दर्जाची शहरी परिसंस्था विकसित केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच वाढवण बंदर ते विरार परिसरात ‘चौथी मुंबई’ विकसित करण्याची संकल्पना पुढे नेण्यात येत असून पालघर जिल्ह्यात देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ आणि मुंबई महानगर क्षेत्रातील तिसरे विमानतळ उभारण्याची राज्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

संभाजीनगर, नागपूर, नाशिकसह नवी विकासकेंद्रे

राज्यात विविध औद्योगिक क्लस्टर्स विकसित करण्यात येत असून मुंबई, पुणे आणि मुंबई महानगर प्रदेशासोबतच छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, नाशिक आणि अहिल्यानगर ही नवी विकासकेंद्रे म्हणून उदयास येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

संरक्षण, विमानवाहतूक, स्वच्छ ऊर्जा, कंप्रेस्ड बायोगॅस आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

२०२९-३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलरचे उपराष्ट्रीय अर्थकारण असलेले राज्य बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून २०२९-३० पर्यंत हे लक्ष्य साध्य करण्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

राजनैतिक समुदाय आणि विविध देशांच्या वाणिज्यदूत कार्यालयांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी बजावलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी आभार मानले. विविध देशांशी सहकार्य आणि भागीदारी अधिक दृढ होत असून त्यातून राज्याच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘भारत-महाराष्ट्राच्या विकासात राजनैतिक समुदाय भागीदार’

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने विविध भाषा, धर्म, संस्कृती आणि प्रदेशांना एका सूत्रात बांधत लोकशाही, समता आणि न्यायाची मूल्ये रुजविल्याचे सांगितले. भारत आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासात राजनैतिक समुदाय महत्त्वाचा भागीदार असल्याचे त्यांनी नमूद केले.

व्यापार, गुंतवणूक, पर्यटन, शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधन, स्टार्टअप, कृषी आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही रावल यांनी दिली.

‘भारताची प्रगती जगासाठी प्रेरणादायी’

कौन्सुलर कॉर्प्सचे डेप्युटी डीन तथा पोलंडचे महावाणिज्यदूत थॉमस यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील धैर्य, त्याग आणि दूरदृष्टीची आठवण करून देणारा असल्याचे सांगितले. एकता, विविधता, लोकशाही आणि प्रगती या मूल्यांचा गौरव करणारा हा दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यानंतर भारताने केलेली प्रगती आणि जागतिक स्तरावरील वाढता सहभाग जगासाठी प्रेरणादायी असल्याचेही थॉमस म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील प्रगतीची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. भारत अधिक न्याय्य, समावेशक आणि समन्वयाधारित जागतिक व्यवस्थेच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देत राहील, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत