‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

महाराष्ट्र

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार यांनी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक होत आदरांजली वाहिली. यावेळी मनात साठलेल्या भावना त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे व्यक्त केल्या.

“आठ महिने झाले… तरी प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक सर्वसामान्यांच्या मुखी आजही एकच जिव्हाळ्याचा शब्द आहे—‘दादा’! त्या एका शब्दात त्यांचे तुमच्यावरचे प्रेम, विश्वास आणि नाते सामावलेले आहे. आज त्यांच्याच भावना मनात घेऊन तुमच्यासमोर उभी आहे,” असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले.

अजित पवार यांच्या पश्चात त्यांची सहचारिणी म्हणून जबाबदारी स्वीकारताना आपल्यासमोर एकच ध्यास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण करणे आणि तुम्ही जपलेला माणुसकीचा वारसा पुढे नेणे, हाच माझा ध्यास आहे. तुम्ही दिलेली शिकवण आणि जनतेशी जोडलेले हे नाते मी आयुष्यभर मनापासून जपत राहीन,” असा भावनिक शब्द सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी दिला.

अजित पवार यांच्या निधनानंतर आठ महिन्यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांशी आणि सर्वसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण सुनेत्रा पवार यांच्या या पोस्टमधून अधोरेखित झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत