मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरण देण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
उच्च शिक्षणातील एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरण धोरण-२०२६’ तयार करण्याच्या अनुषंगाने मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीच्या अहवालावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
समितीच्या वतीने हा अहवाल उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांच्याकडे सादर करण्यात आला. समितीमध्ये महाविद्यालयीन प्राचार्य, कायदे तज्ज्ञ तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, डॉ. हेमलता बागला यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्याने प्रस्तावित धोरणाच्या पुढील कार्यवाहीसाठी महत्त्वाचा आधार उपलब्ध झाला आहे.
एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य, विविध सुविधा आणि संरक्षण कोणत्या पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच या धोरणाचा लाभ देताना संबंधित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीची संमती घेण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
आर्थिक अडचणींमुळे शिक्षणाचा मार्ग खडतर होऊ नये
एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक, सामाजिक किंवा शैक्षणिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, हा प्रस्तावित धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा आणि कौटुंबिक परिस्थितीचा विचार करून त्यांचा उच्च शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, अमोल मुत्याल, प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.