मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल; फक्त शीतल तेजवानीवर आरोप, पार्थ पवारांना दिलासा
पुणे: पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी हिचेच नाव नमूद करण्यात आले असून, या प्रकरणात चर्चेत असलेले दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंढवा परिसरातील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप समोर आले होते. या प्रकरणी शीतल तेजवानी हिला मुख्य सूत्रधार आणि आरोपी ठरवण्यात आले असून, पुणे पोलिसांनी तिच्याविरोधात तब्बल १८८६ पानांचे विस्तृत आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात मात्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचा कोणताही उल्लेख नाही.
या प्रकरणात यापूर्वी पार्थ पवार यांच्यावर आरोप झाले होते. मात्र आर्थिक गुन्हे विभागाच्या तपासात त्यांच्याविरोधात पुरावे न आढळल्याने त्यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणातून त्यांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाच्या चौकशीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “महाराष्ट्र हा राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का? कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का? राजकारण्यांसाठी ‘न्याय’ हा शब्दच रद्द झाला आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यातील परस्पर दाखल दिवाणी दाव्यांचा उल्लेख करत, तसेच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा व्यवहार अवैध ठरवून रद्द करण्यासाठी केलेल्या अर्जाकडे लक्ष वेधले आहे. “मग या प्रकरणात जबाबदारी कोणाची? शिक्षा कोणाला?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, ईओडब्ल्यू (खडक पोलीस ठाणे) कडून फक्त शीतल तेजवानीवरच आरोपपत्र दाखल झाल्याने, दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्यावरील चौकशीबाबत नव्या चर्चेला उधाण आले आहे. “हा न्याय नाही, ही न्यायाची थट्टा आहे,” अशी टीकाही दमानिया यांनी केली आहे.मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील पुढील न्यायालयीन कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.