पुणे: कौसरबाग परिसरातील दोन गटांतील वाद एका गंभीर हिंसाचारात बदलला असून हा वाद थेट ससून रुग्णालयापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोंढवा परिसरातील दोन्ही गटांमध्ये ३ व ४ फेब्रुवारीच्या रात्री हाणामारी सुरु झाली. या वादात अस्लम हनीफ खान (४२) आणि त्यांचा भाऊ सलीम खान यांच्यासह पुतण्या अब्दुल समद हे गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारीला अस्लम खान यांनी कौसरबाग परिसरात झालेल्या धक्काबुक्कीची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षात केली होती. त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी आरोपी शफाक अशफाक शेख (२९) व शहबाज झाकीर खान (३१) यांनी लोखंडी फायटरने अस्लम खान यांच्यावर मारहाण केली.
जखमी अस्लम खान यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले गेले. रुग्णालयात त्यांचा भाऊ सलीम, पुतण्या अब्दुल समद आणि काही मित्र भेटीस आले असता, आरोपींनी पुन्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अस्लम आणि सलीम खान यांच्यावर वार करण्यात आला, तर अब्दुल समद यांच्यावर त्यांची बचाव करताना शस्त्रहल्ला झाला.
या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शफाक शेख आणि शहबाज झाकीर खान यांना अटक करण्यात आली असून, परस्परविरोधी फिर्यादीनुसार मोहम्मद जिब्रान जुनेद सय्यद (३०) यालाही अटक करण्यात आली आहे.
कोंढवा पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील १८ ते २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे पुढील तपास करत आहेत.