महिंद्रा ग्रुपची विदर्भात १५०० एकरावर भव्य गुंतवणूक; हजारो रोजगाराच्या संधी निर्माण

महाराष्ट्र

मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आणखी एक ऐतिहासिक प्रकल्पाची भर टाकली आहे. कंपनीने विदर्भ आणि मराठवाडा प्रांतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची घोषणा केली असून, या प्रकल्पातून राज्यात हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.

विदर्भातील नागपूर जिल्ह्यात तब्बल १५०० एकर जमिनीवर उभारला जाणारा हा देशातील सर्वात मोठा वाहन व ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प असेल. कंपनीने पुढील १० वर्षांत या प्रकल्पात १५ हजार कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे.

विदर्भातील नागपूर प्रकल्पासोबतच मराठवाडा प्रांतातील छत्रपती संभाजीनगरमध्ये १५० एकरवर ‘सप्लायर पार्क’ उभारले जाणार आहे. येथे स्थानिक एमएसएमई आणि पुरवठादारांना सहाय्य मिळणार असून, नागपूर कारखान्यासाठी आवश्यक पार्ट्स पुरवले जातील.

महिंद्राच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात २०२८ पासून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल. पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर दरवर्षी ५ लाखाहून अधिक वाहने आणि १ लाख ट्रॅक्टर उत्पादन केले जातील. येथे पारंपरिक ICE वाहनांसह इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि भविष्यातील SUV तंत्रज्ञानावर आधारित गाड्याही तयार होतील.

औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, महिंद्राची ही गुंतवणूक केवळ कंपनीसाठी नव्हे, तर विदर्भ आणि मराठवाडा प्रांताच्या स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी मोठा प्रोत्साहन ठरणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगार, स्थानिक उद्योग, सेवा क्षेत्र आणि शेतकरी कुटुंबांमध्ये आर्थिक संधींचा नवा मार्ग खुले होणार आहे.