गोकुळच्या कारभारात दूध उत्पादकांचे हित केंद्रस्थानी ठेवा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नवनिर्वाचित चेअरमन राजेश पाटील यांना आवाहन

महाराष्ट्र

मुंबई : राज्यभर चर्चेत असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी गोकुळचे नवनिर्वाचित चेअरमन राजेश पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नवनिर्वाचित चेअरमन आणि संचालक मंडळाशी संवाद साधत गोकुळच्या आगामी वाटचालीबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. गोकुळ दूध संघाचा कारभार करताना दूध उत्पादक शेतकरी सभासदांचे हित नेहमीच केंद्रस्थानी ठेवावे. संघाचे कामकाज शिस्तबद्ध, पारदर्शक आणि काटेकोरपणे चालवून दूध उत्पादकांचा विश्वास अधिक दृढ करावा, असे आवाहन त्यांनी केले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपणे ही संघाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण संस्थेची विश्वासार्हता टिकवून ठेवत तिच्या प्रगतीसाठी सर्व संचालकांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

गोकुळसारख्या महत्त्वपूर्ण सहकारी संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देतानाच संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत