बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत, आणि या दुःखद घटनेचा राजकारणावरही प्रभाव जाणवत आहे.
अजितदादांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अजितदादांच्या पक्षातील काही वरिष्ठ नेते या विलीनीकरणास अनुकूल नसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, पवार कुटुंबात अजितदादांचे पुत्र पार्थ पवार शरद पवार आणि रोहित पवार यांच्यासोबत उपस्थित दिसले आहेत.
या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाचे आवाहन केले आहे. तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय झाला तरी कोणताही सार्वजनिक आनंदोत्सव साजरा करू नये.
ते म्हणाले, “महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान शांततेत पार पडले आहे. आपण सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आणि दाखवलेल्या शिस्तीबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. अजितदादांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली म्हणजे संयम, शिस्त आणि साधेपणा राखणे.”
तटकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की, ९ तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर विजय सोहळे, मिरवणुका, रोड शो, फटाके किंवा कोणताही सार्वजनिक जल्लोष टाळावा. “दादांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली म्हणजे संयम आणि साधेपणा राखणे,” असे त्यांनी नम्रपणे सांगितले आहे.