जनाची नि मनाची दोन्हीची लाज ठेवा, शिवनीती आचरणात कधी आणणार?

महाराष्ट्र

मुंबई: भीक नको कुत्रं आवर, नंगे से खुदा भी डरता है! अशा म्हणी वारंवार प्रकर्षाने केवळ महिलाच नाही तर पुरुषांच्या मनातही येत असतील. महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक सोहळे झाले, विधानसभेत महिला आमदाराच्या लक्षवेधी आल्या. अनेक मंत्री,सत्ताधारी व विरोधी पक्षी आमदार अनुपस्थित असलेले दिसले. चौथे महिला धोरण येण्याचा मार्ग सुकर झाला, पण आपण अजुनही धर्मिय आवरणात महिला सुरक्षेचे मोजमाप करतोय हे दिसून आले. तसाच प्रकार आता सत्ताकारणाच्या गल्रिच्छ स्पर्धेत दिसतोय.

पुरूषांना बदनाम करण्यासाठी स्त्री हत्यार म्हणून वापरली जाते,तर राजकारणात स्त्री सॉफ्ट टार्गेट म्हणून वापरली जात होती आणि आता तर चॅनल्स ,समाजमाध्यमातून सहजी मिळणाऱ्या प्रसिध्दीने बदनामी,चारित्र्यहनन याची धार जास्त धारदार झालीय! त्याहूनही ती अतिरेकी बनली आहे असं म्हणणं संयुक्तिक ठरेल.

खरं तर आज प्रतिबिंब म्हणजे आरसा कोणाला नि कस कसला दाखवायचा हा खूपच भीषण प्रश्न मनात आला! आपल्या स्तंभाची जागा फक्त कोरी ठेवून चिध्या कपडे घातलेली ,तोंडावर पट्ट्या लावलेली बाई दाखववी की सोबत तसाच पुरूषही दाखवावा? पण असं करायला पेपर थोडाच आपल्या मालकीचा आहे? पण लिहिल्याशिवाय जनमानसातील संताप कळणार कसा? यथा राजा तथा प्रजा पासून यथा प्रजा तथा राजा म्हणण्याची वेळ आलीय की काय ? असं वाटू लागलंय. जनतेचं सरकार, जनतेचा विचार किती करतं,वेळेत न्याय किती देते ? हे महत्वाच असत.

मागील मविआ सरकारच्या काळात जी टार्गेट्स बदनामी सत्र वाढली, सरकारवर असे हल्ले होत राहिले ,तेच आताही चालू असलेले दिसतात. ना महिलांना लक्ष्य करून बदनामी करणाऱ्या मंत्री आमदारांना शासन झाले ना कोणती कारवाई? का आम्ही सहन करायचे असे लोकप्रतिनिधी? का सहन करायची लांछनास्पद वागणूक? राज्यातील मायलेकी रस्त्यांवर पडल्यात की त्याची किंमत महत्त्व सरकार, लोकप्रतिनिधींना कळत नाही? असा प्रश्न विचारला तर सरकार घोषणा तर मोठ्या करतय,पण कृतीत मात्र मागे आहे असं दिसतय.

समाजमाध्यमातून तर सर्रास चिखलफेक सुरूच राहातेय. महिलांसठी कायदे अधिकार हवेतच पण त्याचा गैरवापर करणारेही वाढलेत. पोलीस कारवाई करताना माती का खातात? तर राजकीय दडपण वर्चस्व यात अंमलबजावणी मागे पडते. एकेक सुविधा कायदे असे की लाभार्थी प्रयत्न करून थकून जातात. राज्यकर्ते घोषणा करतात ,पण अंत्योदयापर्यंत पोहोचत नाहीत, हे फारच वेदनादायक. काल शीतल म्हात्रे याचा एक विडियो वायरल झाला,त्यावर जे काही रणकंदन माजलय ते पहाता,पूर्वीचे अनेक महिलांचे बदनामीचे विषय आठवले. खरं तर आज मंत्रीमंडळात अब्दुल सत्तार, संजय राठोड का आहेत हा सवाल सरकारला आम्ही विचारतोय.

तोच विषय म्हात्रेची बदनामी कुणी व का केली इथपर्यंत येऊन पोहोचतो. आमच्या लोकप्रतिनिधींना कस वागावं बोलावं याची शिकवण देण्याची गरज आहे! जेव्हा समाजमाध्यमातून व्यक्त होतो तेव्हा आपण कोण याची जाणीव आणि आपण कसे वागावे याचे भान नाहीच हे यांना शिकवायला हवे. समाज जागृत होतोय, कायदे नियम सर्वानाच सारखे हवेत. ते होताना दिसत का? हक्कभंग अधिकार सर्वसामान्यांना का असू नये? जो भयंकर खेळ सत्ताकारणाचा सुरू झालाय तो महाराष्ट्रातील संस्कृतीला धक्का लावणारा आहे याचे भान येण्याची गरज आहे,ती नाही झाली तर जनता ती आणून देइल अशी वेळ आलीय.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आपण गौरवाने घेतो पण तसे वागतो का? शिवनीती आचरणात आणतो का? शिवाजीराजांनी नेहमीच स्त्री सन्मान केला! आम्ही काय करतो? सन्मान म्हणजे काय याची उजळणी एकदा व्हायला हवीच. जनाची मनाची लाज सगळ्यानीच ठेवायला हवीच, नाहीतर ती जाणीव जनता करून देईलच. राजा, सेवकहो,लोकप्रतिनिधीं,नेते जागे व्हा आणि नारीशक्तीसाठी मनापासून काम करा. महिला धोरण अंमलात आणताना सर्वाचे सहकार्य आवश्यक आहे.