खरात म्हणजे महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत खरातला थेट आसाराम बापू आणि गुरमीत राम रहिम सिंह यांच्यासारखा संबोधले. महिलांचे शोषण करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास “५८ नव्हे तर शेकडो व्हिडिओ समोर येतील,” असा गंभीर दावा त्यांनी केला.गांधी भवन येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा असतानाही अशा भोंदूबाबांचा उच्छाद सुरू आहे, हे धक्कादायक आहे. अशोक खरातला कोणाचा तरी राजकीय आशिर्वाद असावा, त्यामागील शक्ती उघड झाली पाहिजे.”

महिला आयोगाचे वर्तन धक्कादायक

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरही सपकाळ यांनी गंभीर आरोप केले.“महिला शोषणाविरोधात काम करणे अपेक्षित असताना त्यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केली. हे कृत्य भोंदूबाबांना पाठबळ देणारे आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह असून त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. 

“दाभोलकरांचा लढा आणि आजची परिस्थिती”

सपकाळ यांनी अंधश्रद्धेविरोधी लढ्याचा संदर्भ देताना नरेंद्र दाभोलकर यांचे नाव घेतले.“दाभोलकरांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात लढा दिला, पण त्यांनाच ठार मारण्यात आले. आजही राज्यात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे,” असे ते म्हणाले.

जानकर–सपकाळ भेट; पोटनिवडणुकांवर चर्चा

दरम्यान, महादेव जानकर यांनी गांधी भवन येथे सपकाळ यांची भेट घेत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी पोटनिवडणुकांवर चर्चा केली.

सपकाळ म्हणाले की, “नांदेड, देगलूर आणि कसबा पोटनिवडणुकांत काँग्रेसने विजय मिळवला आहे. बारामती आणि राहुरी संदर्भात महाविकास आघाडीमध्ये चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.” एकीकडे भोंदूबाबा प्रकरणावरून राज्यात संतापाची लाट असताना, दुसरीकडे या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही तीव्र होताना दिसत आहेत.