भोंदूबाबा प्रकरणावरून राजकारण तापलं; रूपाली चाकणकर अडचणीत, दत्तात्रय भरणे यांची ठाम पाठराखण

महाराष्ट्र

मुंबई: ज्योतिष व तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेचं शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अशोक खरात मुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या प्रकरणावरून राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकर यांची ठाम बाजू घेतली आहे. इंदापूर दौऱ्यावर बोलताना भरणे यांनी स्पष्ट केलं की, “या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा कोणताही दोष नाही. त्या एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या असतील. कोण चांगला आहे की भोंदू, हे प्रत्येकवेळी ओळखणं शक्य नसतं.”

भरणे पुढे म्हणाले, “कोणी आपल्याला कुठे बोलावलं आणि आपण गेलो, त्यावरून पुढे काही घडलं, तर त्यासाठी आपल्यालाच दोषी धरणं योग्य नाही. एखाद्या ठिकाणी गेल्यावर दर्शन झालं किंवा फोटो काढला गेला, म्हणून त्यात चूक ठरवणं चुकीचं आहे.”

या पार्श्वभूमीवर, विरोधकांनी मात्र चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली आहे. त्यामुळे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता राजकीय रंग घेऊ लागलं असून पुढील काही दिवसांत हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.