पनवेल, उरण येथील शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला..
मुंबई: एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रमुख पक्ष म्हणून काम करत असून जसा सचिन तेंडुलकर मॅचविनर खेळी करायचा तशीच मॅचविनर खेळी करुन भविष्यात आपल्याला जिल्ह्यात पक्षाला बळ देऊया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मुंबईत केले. पनवेल, उरण येथील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या मुळ विचारधारेवर ठाम रहात आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा घेतलेल्या निर्णयाला राज्यातील जनतेने मोठया प्रमाणात पाठिंबा देत विधानसभेत घवघवीत यश मिळवून दिले. भविष्यातही एनडीएचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उत्तम काम करेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
पनवेल, उरण, येथील शिवसेना शिंदेगटाचे युवासेना राज्य सचिव आणि कोकण समन्वयक रुपेश पाटील, समाजसेवक तेजस ढकी, युवासेना जिल्हा अध्यक्ष रोशन पवार, युवासेना विधानसभा अध्यक्ष रोशन कृष्ण पुजारी, खारघर उपशहर प्रमुख शैलेश शिंदे, खारघर महिला शहर प्रमुख चंचला संदेश बनकर, मुस्लिम युवा नेते हाजी मुद्दस्सर पटेल आदींनी प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.