मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण: फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी आल्याचा दावा

महाराष्ट्र

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली होती. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी मोर्चे काढले होते. या वाढत्या दबावानंतर पोलिस प्रशासनाने तपासाला गती दिली असून प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात वाल्मिक कराड हा कटाचा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, कृष्णा आंधळे हा अद्याप फरार असून तो जिवंत आहे की नाही, याबाबतही चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.

सर्व साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर होणार

धनंजय देशमुख यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेल्या लॅपटॉपमधील संपूर्ण डेटा रिकव्हर झाला आहे. येत्या सुनावणीत सर्व साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली जाणार आहे.

“मागील काही दिवसांत सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चार्ज फ्रेम होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र आता दोषारोप दाखल झाले असून लवकरच साक्षी-पुराव्यांची यादी सादर केली जाईल. ही केस लवकर मार्गी लागावी, ही आमची मागणी आहे,” असे धनंजय देशमुख म्हणाले.

आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी पाठपुरावा

येत्या सहा तारखेला होणाऱ्या सुनावणीत आरोपींची संपत्ती जप्त करण्याबाबत पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी वकील यांच्यामार्फत यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत.

“सीज केलेली खाती लवकर जप्त करण्यात यावीत, यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत,” असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

फरार कृष्णा आंधळे तीन वेळा गावात?

धनंजय देशमुख यांनी दावा केला की, फरार आरोपी कृष्णा आंधळे गेल्या सहा महिन्यांत तीन वेळा गावी येऊन गेला आहे. ही माहिती संबंधित तपास यंत्रणेला देण्यात आली असून त्यांनीही आरोपी गावात आल्याची बाब मान्य केल्याचे ते म्हणाले.

मोबाईलचा वापर न करत असल्याने तपास यंत्रणांना त्याचा माग काढण्यात अडचणी येत आहेत. “आरोपीमुळे आमच्या कुटुंबाच्या जीवितास धोका आहे. त्याला तातडीने जेरबंद करावे,” अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले असून फरार आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.