मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या पर्यटन प्रकल्पांना गती देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
मेघदूत शासकीय निवासस्थानी रायगड लोकसभा मतदारसंघातील पर्यटन विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार सुनिल तटकरे, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ चे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील अधिकारी दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, रायगड हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा असून येथे पर्यटन विकासाची कामे गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रादेशिक पर्यटन योजनांतील प्रलंबित कामांची सद्यस्थिती लक्षात घेऊन ज्या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
उपलब्ध निधीमधून प्राधान्याने कामांना निधी देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच तारांगण निरीक्षण (स्टार गेझिंग) प्रकल्पाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत निवासी न्याहारी (Bed & Breakfast) नोंदणी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठवावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कासव संवर्धन प्रकल्प आणि पेशवे स्मारकाच्या कामांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या पर्यटन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘स्वदेश दर्शन’ योजनेसाठी पर्यटन विकासाच्या प्रस्तावांना प्राधान्याने पाठवावे, तसेच निवासी न्याहारी नोंदणी शिबिरे आयोजित करावीत, असेही त्यांनी नमूद केले.