शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दरोड्यांचे सत्र सुरुच; पाचर्णे मळ्यात पुन्हा एकदा लाखोंची घरफोडी

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासुन चोऱ्या, दरोडा यांचे सत्र सुरुच असुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असुन काही दिवसांपुर्वी शिरुर पोलिस स्टेशनमधील एका पोलिस कर्मचाऱ्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्या घटनेचा अजुनही तपास लागलेला नाही. तसेच शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक गंभीर गुन्हे घडत असतानाही पोलिसांकडुन त्याचा तपास लागत नाही. तसेच पोलिसावर हल्ला करणारे आरोपी अजुन निष्पन्न न झाल्याने जर पोलिसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासुन दरोड्यांचे सत्र सुरुच असुन शिरुर-गोलेगाव रोडच्या नजीक असणाऱ्या पाचर्णे मळा येथे (दि 21) जुन रोजी दिवसाढवळ्या बंद फ्लॅटच्या दरवाजाची कडी आणि कोयंडा कापून अज्ञात व्यक्तीने घरफोडी करत लाकडी कपाटात ठेवलेले रोख रक्कम एक लाख रुपये तसेच सोन्याचे दागिने असा एकून 3 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला असल्याने रविंद्र सुर्यभान कळमकर (वय 43) रा. पाचर्णे मळा, गोलेगाव रोड, घोडोबा मंदीरासमोर, (ता. शिरूर) जि पुणे यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असुन पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील या घटनेचा पुढील तपास करत आहेत.