पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ६८ टक्के मतदान

महाराष्ट्र राजकीय

अजित पवारांच्या निधनाचे सावट; बारामतीत मतदानाचा टक्का घसरला

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली होती. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर सभा टाळत थेट मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला. त्यामुळे पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सरासरी ६८ टक्के मतदान झाले.

गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात ७०.३५ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र दुःखाचे वातावरण आणि मतदारांमधील निरुत्साह याचा परिणाम मतदानावर स्पष्टपणे दिसून आला.

मतदानाचा टप्प्याटप्प्याने आलेला आकडा

पुणे जिल्हा परिषदेसाठी ७३ गट आणि पंचायत समितीसाठी १४६ गण असून, एकूण २९ लाख ७६ हजार ८०५ मतदार होते.

पहिल्या दोन तासांत: ७.७४%

सकाळी ११.३० वाजेपर्यंत: २१%

दुपारी १.३० वाजेपर्यंत: ३०%

दुपारी ३.३० वाजेपर्यंत: ५१%

शेवटच्या दोन तासांत मतदानाचा वेग फारसा न वाढल्याने सरासरी मतदान ६८ टक्क्यांवर स्थिरावले.

बारामतीत मतदानात लक्षणीय घट

अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीत यंदा मतदानात मोठी घट झाली. गेल्या निवडणुकीत येथे सुमारे ६१ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावेळी शोकमय वातावरणामुळे केवळ ५३ टक्के मतदान नोंदवले गेले.

बारामतीतील मतदानाचा तपशील पुढीलप्रमाणे –

पहिल्या दोन तासांत: ६.५२%

सकाळी ११.३० वाजेपर्यंत: १८%

दुपारी १.३० वाजेपर्यंत: ३०%

दुपारी ३.३० वाजेपर्यंत: ४१%

शेवटच्या दोन तासांतही मतदार घराबाहेर न पडल्याने मतदानाचा टक्का ५३ वरच थांबला.

जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’ विरुद्ध भाजप लढत ठळक

पुणे जिल्हा हा दिवंगत अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. १९९९ पासून जिल्हा परिषदेचा कारभार त्यांच्या नेतृत्वाखाली होता. मात्र, त्यांच्या निधनामुळे यंदाच्या निवडणुकीवर दुःखाचे सावट आहे.

जिल्हा परिषदेच्या ७३ गटांपैकी ५९ गटांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप हे महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

या निवडणुकीत

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार): ७१ उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार): ७ ठिकाणी उमेदवार

भाजप: ५९ उमेदवार

शिवसेना (शिंदे): ३६ उमेदवार

शिवसेना (ठाकरे): २६ उमेदवार

आंबेगाव, मावळ आणि मुळशी तालुक्यांत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ गट समोरासमोर आहेत. याशिवाय काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, आप, रासप आणि बसपा यांनीही उमेदवार उभे केले आहेत. मात्र, खरी लढत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातच असल्याचे चित्र आहे.

मागील निवडणुकीतील बलाबल

मागील निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने ४४ जागा जिंकत जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली होती.

शिवसेना: १३ जागा

भाजप: ७ जागा

काँग्रेस: ७ जागा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले मतदान

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.