आता थकीत वीजबिलापोटी वीज कनेक्शन कट होणार नाही…

महाराष्ट्र

औरंगाबाद: आधीच आस्मानी-सुलतानी संकटांनी भांबावलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयोगाने शेतकऱ्यांसाठी मोठा निकाल दिला आहे. त्यानुसार, थकीत वीजबिलापोटी आता कोणत्याही शेतकऱ्याची वीज आता महावितरणला कापता येणार नाही. आयोगाने महावितरणला तसा सूचना वजा आदेशच दिला आहे.

थकीत वीजबिलाच्या मुद्द्यावरुन अनेकदा महावितरणकडून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात होता. त्याविरोधात लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने सचिन धांडे यांनी महावितरणविरोधात (MSEB) अन्नसुरक्षा आयोगात याचिका दाखल केली होती. त्यावर आयोगाने नुकताच निकाल दिला.

गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यात कृषिपंपाची वीज कापली गेल्यास शेतकऱ्यांना रब्बी पिकेही घेणं मुश्किल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिके उभी असताना, कुठल्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेशच अन्न सुरक्षा आयोगाने महावितरणला दिला आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.

शेतकऱ्याने शेतात अन्नधान्य पिकवलं नाही तर आपण काय खाणार? त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा व्हायला हवा. अर्थात तो त्यांचा अधिकारच आहे. असा दृष्टिकोन ठेवत राज्य अन्नसुरक्षा आयोगाने महत्वपूर्ण निकाल दिल्याने महावितरणाला आता शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापता येणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.