पोकरा योजनेतील भ्रष्टाचारात अधिकारी दोषी; अंबादास दानवे

महाराष्ट्र

नागपूर: शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या पोकरा योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असून एकाच योजनेतून दोनदा लाभ घेतला जातो. अकोला जिल्ह्यात या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारात अधिकारीही दोषी असून यावर कारवाईची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

शेततळे, फळबाग, कृषी लागवड, तुषार व ठिबक सिंचन आदीसाठी शेतकऱ्यांना पोखरा योजनेच्या माध्यमातून लाभ होत असतो. अकोला जिल्ह्यात ११६ गटांमध्ये कृषी कंपन्यांनी अवजारे खरेदीमध्ये कोटींचा घोटाळा केला आहे. यात मंजुरीपेक्षा कमी अवजारे खरेदी केली असून काही ठिकाणी एकही अवजारे खरेदी न करता ३ कोटी ६३ लाख रुपयांचा अपहार झाल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडली.

एका गटाने ट्रॅक्टर खरेदी न करताच पोखरा योजनेत दाखवून त्याचा लाभ घेतला. तर एकाने जुनं शेततळ नव्याने दाखविले.तर काहींनी मधु मक्षिका पेट्या विकत न घेता अनुदान घेतले आदी सर्व प्रकार पैठण आणि सिल्लोड मध्ये घडल्या आहेत. तर काही ठिकाणी शेडच बांधकाम नसताना अवजर वितरित केली गेली. काही शेतकरी एकाच योजनेचा दोनदा लाभ घेतात. यामागे एजंट हे कृषी अधिकारी यांच्यासोबत सहभागी असतात. शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे हा योजनेचा मुख्य उद्देश असून त्यासाठी काही उपाययोजना करणार का असा सवाल करत या दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी दानवे यांनी केली.

वर्तमानपत्राच्या बातमीवर अमरावती विभागातील कृषि संचालकांनी चौकशी सुरू केली. चौकशी अंती वाटप करण्यात आलेल्या अवजारांपैकी उपलब्ध साधनात तफावत असल्याचे आढळले. त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कृषी विभागीय आयुक्त यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे उत्तर सरकारकडून देण्यात आले.