जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक पणे काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात. विकास कामांसाठी निधी आणण्यासाठी सत्तेत जावे लागते असे काही जण म्हणतात. पण चांगलं काम करणारा व जागरुक लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटत असतात असे प्रतिपादन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांनी शिरुर येथे केले. 

       

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर मधील कापड बाजारातील पाच कंदील चौकात माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार ॲड अशोक पवार, उत्तम जानकर , माजी आमदार काकासाहेब पलांडे, जगन्नाथ शेवाळे, अंकुश काकडे, सुजाता पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

पवार म्हणाले की काही जण सांगतात लोकसभेत जायचे आहे .नुसते जावून काय उपयोग नाही. विकासनिधी पण आणावा लागतो. मी गेल्या ५६ वर्षापासून विविध सभागृहात लोकप्रतिनिधी आहे. त्यात २० ते २२ वर्ष मंत्री म्हणून काम केले. इतर काळावधीत लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. परंतु मंत्री नाही म्हणून विकासकामे झाली नाहीत असे नाही. 

 

बदलत्या राजकिय परिस्थितीवर भाष्य करताना पवार म्हणाले की पुणे जिल्ह्यात जुन्नर,आंबेगाव, खेड व शिरुर मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार होते. त्यापैकी तीन आमदारांनी आपल्या वाटा बदलल्या, पण शिरुरच्या आमदारांनी वाट बदलली नाही. भविष्यात काही देण्याची वेळ आली तर शिरुरला मोकळे ठेवणार नाही असे आवर्जून पवार यांनी सांगितले. संसदेत लोकप्रतिनिधी म्हणुन सर्व घटकांची प्रभावी बाजु खासदार सुप्रिया सुळे व डॉ अमोल कोल्हे मांडत असतात असे सागत कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. 

             

माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की सध्या सामान्य माणूस, छोटे व्यवसायिक भरडले गेले आहेत. चुकीच्या पध्दतीने कर आकारणी केली जात आहे. या मतदारसंघात अशोक पवार यांनी चांगलं काम केलं. ते साखर कारखाना चांगल्या प्रकारे चालवत होते. परंतु अशोक पवार नमले नाहीत, त्यांनी आमच्या मनासारखी भुमिका घेतली नाही. आमचं ऐकलं नाही म्हणुन त्यांचा कारखाना बंद पाडण्याची व्यवस्था करण्यात आली. पुणे जिल्ह्यात एकच माईचा लाल निघाला त्यांनी पवार साहेबांना सोडल नाही. परंतु काही दिवसातच हा कारखाना पुन्हा सुरु होईल असेही पाटील यांनी सांगितले. 

 

आमदार रोहित पवार म्हणाले की शरद पवार यांची तब्येत बरी नाही. त्यांना विश्रांतीची विनंती आम्ही केली पण ते स्वतःचा विचार न करता महाराष्ट्राचा विचार करत विचारांच्या लढाईसाठी बाहेर पडले आहेत. डॉ अमोल कोल्हे शिरुर लोकसभा मतदार संघातून तीन लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे लोक पक्ष सोडुन गेले त्यांना सामान्य लोकांच्या विकासासाठी नाही तर स्वतःच्या आणि मित्रांच्या विकासासाठी पक्ष सोडुन गेल्याची टीका त्यांनी केली. भाजपा २०० च्या पुढे जागा जिंकणार नाही. राज्यात महाविकास आघाडीच्या ३५ जागा निवडून येतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. 

 

शिरुरचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, समोरच्या उमेदवार डमी उमेदवार आहे. भाजपाने कांदा उत्पादकांना फसवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात मी त्यांना राजिनामा देतो असे म्हणालो, मी असे कधी जाहीरपणे म्हणालो नाही. पण तुम्ही भावनिक होऊन राजीनामा देऊन शेती करायला जातो असे म्हणाले होते. त्याच काय…? बिबट्या प्रवण क्षेत्रात दिवसा शेतीला पाणी द्या त्याचबरोबर बिबट्या प्रवण क्षेत्रातील बिबट्याचा उपद्रवाचा संदर्भात मार्ग काढा यासाठी मी वारंवार आपल्याकडे पाठपुरावा केला. पण आपण त्यासाठी काय केलं हे पण जनतेला सांगा. 

 

आमदार ॲड अशोक पवार म्हणाले की आम्ही निष्ठेने शरद पवार यांचा पाठीशी उभे राहिलो. आपल्या घोडगंगा साखर कारखान्याला जेव्हा यंदा कर्ज पाहिजे होत. तेव्हा जुन-जुलै महिन्यात NPA खात नव्हतं. कारखान्याच खात जुलै महिन्यात NPA नसताना कर्ज अडवलं गेलं. अन काहीजण सांगतात आम्ही काय केलं असा सवाल अशोक पवार यांनी उपस्थित केला. 

 

पवारांची पावर अन सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी…

शिरुर शहरात कापडबाजारात असलेल्या पाचकंदील चौकात मोठया प्रमाणात सर्वसामान्य लोकांनी गर्दी केली होती. शरद पवार हे अनेक वर्षांनी शिरुर येथे सभेला आले होते. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी जेष्ठ नागरिक, महिला तसेच तरुणांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. ‘आम्ही साहेबांसोबत’ असे वाक्य लिहिलेल्या टोप्या घालुन अनेक तरुण सभेला उपस्थित होते. शरद पवारांनी या तरुणांकडे पाहत हात उंचावताच युवकांनी ‘पवार साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत परीसर दणाणुन सोडला. 

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत