पंढरपूर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात बुधवारी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, समाधान काळे व गणेश पाटील यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उमेदवारीवरून राष्ट्रवादीत झालेल्या कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
भाजपकडून समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना वाखरी तर गणेश पाटील यांच्या मातोश्री प्रफुल्लता पाटील यांना भोसे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाळवणी गटातून जयश्री पोपट लोखंडे यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे करकंब येथील भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी स्वीकारली आहे.
दरम्यान आमदार अभिजीत पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांवर उमेदवार दिले असून भागीरथ भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मनसेने टाकळी व रोपळे गणात, तर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने भाळवणी गणात उमेदवारी दिली आहे.
आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत पायी रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. भाजप व राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली असून प्रत्येक गटात मातब्बर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. करकंब गटात देशमुख बंधूंमध्ये थेट लढत होणार असल्याने ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे.