राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्ष प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेस प्रदेशाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री अनिस अहमद आदी नेते उपस्थित होते.
रणजित शिरोळे यांच्यासोबत उरण येथील भाजपाचे पदाधिकारी यशवंत म्हात्रे, आम आदमी पक्षाचे थॉमस मॅथ्यू, सामाजिक कार्यकर्ते जयेश ठाकूर, कृष्णा श्रीवास्तव आणि सेधुरमण अय्यर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशातील राजकीय वातावरण बदलत असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सर्व स्तरांतून विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. दिवाळीची सुरुवातच पक्षप्रवेशाचे फटाके फोडून झाली आहे. आगामी काळात अनेक तरुण आणि उमदे नेतृत्व काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस प्रवेशानंतर रणजित शिरोळे यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. शिरोळे कुटुंबाचा काँग्रेस विचारांशी जुना ऋणानुबंध आहे. हाच वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असून पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचे विचार घराघरांत पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे रणजित शिरोळे यांनी सांगितले.
या पक्षप्रवेशामुळे मुंबईसह उरण परिसरातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून मनसे, भाजप आणि आम आदमी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.