विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गिग वर्कर्सना मोफत पेट्रोल वाटप
मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते राहुल गांधी यांच्या कार्यावर आधारित ‘शिदोरी’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस अभिजित सपकाळ, गुरबिंदरसिंग बच्छेर, प्रदेश सरचिटणीस व ‘शिदोरी’चे प्रबंधक संपादक अनंत मोहोड, कार्यकारी संपादक सुनिल खांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, मुंबई युवक काँग्रेसच्या वतीनेही राहुल गांधी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आणि मुंबई उत्तर मध्य जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखील रुपारेल यांच्या पुढाकाराने ‘गिग वर्कर्स सन्मान’ उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत अॅप-आधारित दुचाकी वितरण सेवा देणाऱ्या गिग वर्कर्सना मोफत पेट्रोलचे वाटप करण्यात आले.
तसेच कुलाबा विधानसभा मतदारसंघातील मुंबई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देणे, युवा पिढीला सक्षम बनवणे आणि समाजसेवेची बांधिलकी जपणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी मुंबई युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस तेजस चंदूरकर तसेच युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत देशातील महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि लोकशाहीवरील आव्हानांबाबत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांचे नेतृत्व देशासाठी महत्त्वाचे असून त्यांना पंतप्रधानपदावर विराजमान करण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.