राज ठाकरे यांच्या हस्ते ‘दादर अभिमान गीत’ सोशल मीडियावर लॉन्च

महाराष्ट्र

मुंबई: दादर ही एक संस्कृती आहे. दादर ही केवळ दादरमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांसाठीच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाची जननी आहे. सण, उत्सव, सभा, सिनेमा, नाटक आणि खरेदी ह्यांचे पूर्वपरंपार मराठमोळे माहेरघर म्हणजेच आपले दादर. दादरमधील सांस्कृतिक वारसा, दादरच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख नव्या पिढीला नव्याने करून देता यावी यासाठी दादर येथील नव्या दमाच्या प्रणिल हातिसकर या तरुणाने “दादर अभिमान गीत” तयार केले आहे, नुकतेच हे गीत मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले.

“दादर अभिमान गीत” ह्या गाण्यात दादरचा प्रवास तीन पिढयांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न प्रणिलने केला असून प्रणिल हातिसकरने निर्मिती, दिग्दर्शन, गायन,लेखन अशी सगळीच महत्वाची धुरा त्याने सांभाळली आहे. आघाडीचा अभिनेता सुयश टिळक, सिनेनाट्य अभिनेत्री प्रिया मराठे तसेच जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर व जेष्ठ अभिनेत्री उज्वला जोग ह्यांनी ह्या गाण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत.

मूळात अवघं आयुष्य दादरभोवती फिरत असलं की तुम्हाला दादरकर हा शिक्का लागतो. विद्यार्थी म्हणून बालपण बालमोहन विद्यामंदिरमध्ये गेलं त्यामुळे शिवाजी पार्कचा निकटचा संबंध आणि म्हणूनच पार्कला फेरफटका मारल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही.

दादरच्या वलयात वाढल्यामुळे दादरची संस्कृती अंगवळणी पडली, मूळात आपल्या मराठी माणसाचे,संस्कृतीचे दादर हे माहेरघरच.म्हणूनच सामान्य माणसाची खोली जरी १० बाय १० ची असेल तरी वास्तव्य मात्र राजमहालासारखं, ह्या दादरचा सामान्य माणसाचा प्रदीर्घ प्रवास, त्रेधातिरपीट हे वेगळ्या शैलीत व्यक्त व्हावं असा हट्ट होता, आणि त्यातूनच दादर विषयीच्या लेखणीतून दादर अभिमान गीताने आपसूकच जन्म घेतला असल्याचे निर्माता, दिग्दर्शक प्रणिल हातिसकरने सांगितले.

“दादर अभिमान गीत” नव्याकोऱ्या प्रणिल आर्ट्स ह्या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. गाण्याचे उत्तम गीत लेखन, कलाकारांचा साजेसा सुंदर अभिनय त्यामुळे गाण्याला चारचाँद लागले आहेत. ह्या गीताला बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुद्धा खंबीर पाठिंबा दर्शवला आहे.