मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर (sachin Tendulkar) यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सचिन यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) देखील उपस्थित होत्या.
सचिन तेंडुलकर यांनी आपल्या ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन यांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली. अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात झालेल्या या भेटीत दोन्ही मान्यवरांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
विशेषतः राज्यातील क्रीडा सुविधा, युवा खेळाडूंना उपलब्ध होत असलेल्या संधी आणि क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सचिन तेंडुलकर यांना दिली. या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक संवाद सुरू ठेवण्याची भूमिका दोघांनी व्यक्त केली.या भेटीमुळे क्रीडा आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.