लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती; राज्यभर मंदिरांत प्रार्थना

महाराष्ट्र

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे उद्या, ९ फेब्रुवारी रोजी राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी महाआरती व प्रार्थना करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला असून, राज्य अजूनही या दुःखातून सावरलेले नाही. या पार्श्वभूमीवर ९ फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही सोहळे, कार्यक्रम अथवा उत्सव आयोजित करू नयेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यानुसार राज्यभर कोणतेही वाढदिवसाचे कार्यक्रम होणार नसून, एकनाथ शिंदे स्वतःही वाढदिवस साजरा करणार नाहीत.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीने कोणतेही सार्वजनिक सोहळे न करता, महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ’ एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी राज्यातील विविध मंदिरांमध्ये महाआरती व प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला आहे.या उपक्रमात शिवसेना महिला आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्या सहभागी होणार असून, हा उपक्रम पूर्णतः श्रद्धा आणि संयम राखून पार पडणार असल्याची माहिती महिला आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे.