मुंबई: अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील वाहतूकदारांना ५ तारखेपासूनचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
राज्यातील विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, “इ-चलनांच्या कारवाईबाबत वाहतूकदारांच्या भावना तीव्र आहेत. पार्किंगमध्ये उभ्या वाहनांवर आकसाने इ-चलन काढले जात असल्याच्या तक्रारी आहेत. प्राधिकृत अधिकाऱ्यांऐवजी इतर कर्मचाऱ्यांकडून कारवाई होत असल्यास ते अन्यायकारक आहे.” संबंधित यंत्रणेला कडक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येत्या ५ तारखेला परिवहन आयुक्त, पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होणार असून, त्यात प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत आंदोलन स्थगित ठेवावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.