ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निधनाने संपूर्ण साहित्य विश्वावर शोककळा
मुंबई: मराठी ग्रामीण कथालेखनाचे महत्त्वपूर्ण शिलेदार आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निधनाने संपूर्ण साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या लेखनातून ग्रामीण समाजाचे वास्तव आणि संवेदना प्रभावीपणे साकारल्या गेल्या. त्यांच्या निधनाबद्दल विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक व्यक्त करत बोराडे कुटुंबियांचे सांत्वन केले.
“प्रा. रा. रं. बोराडे यांच्या दुःखद निधनाने वास्तवदर्शी लेखनाचा एक तेजस्वी दिवा मालवला. मराठी साहित्य विश्वाची यामुळे मोठी हानी झाली आहे. ग्रामीण जीवनाचा वेध घेणारे त्यांचे लेखन असंख्य वाचकांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि साहित्यसंवेदना कायम स्मरणात राहतील. बोराडे सरांचे निधन हे कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच एक मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत.” असंही या दु:खदप्रसंगी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
बोराडे सरांच्या जाण्याने ग्रामीण जीवनाच्या अंतरंगावर भाष्य करणारा एक सशक्त आवाज हरपला आहे. त्यांच्या लेखनातून सामान्य माणसाच्या भावना प्रभावीपणे शब्दबद्ध झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, संपूर्ण साहित्य क्षेत्रात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.