शिरूर तालुक्यातील रामलिंग यात्रेच्या नियोजनाची बैठक शिरूर तहसिल कार्यालयात पार पडली

शिरूर तालुका

शिरूर (अरूणकुमार मोटे): पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्यातील शिरुर शहरासह पंचक्रोशीचे आराध्य दैवत प्रभू श्री रामलिंग महाराजांच्या महाशिवरात्रीला होत असलेल्या यात्रा महोत्सवास यंदा एकावन्न वर्षे पूर्ण होत असल्याने यात्रेची मोठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्साहाच्या नियोजनाची बैठक शुक्रवार दि.१४ रोजी शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

शिरूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर श्री रामलिंग मंदिर असून, या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना खुद प्रभू श्री रामचंद्रांनी केल्याची आख्यायिका आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला या देवस्थानची मोठी यात्रा भरते. (दि. २५) फेब्रुवारीला शिरूर येथून रामलिंग येथे पालखीचे प्रस्थान होत आहे . (दि.२6) फेब्रुवारी रोजी रामलिंग येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन केले जाते .लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात. (दि. २७) रोजी भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली जाणार आहे.

यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आरोग्य विभाग, पंचायत समिती पोलीस विभाग, पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण रुग्णालय शिरूर, महावितरण,रामलिंग देवस्थान, ग्रामपंचायत विभाग, यांच्याकडून यात्रेसाठी भाविकांना देण्यात येणाऱ्या सुखसुविधांची माहिती घेवून यात्रा सुरळीत व्यवस्थित पार पाडण्यासाठी सूचना केल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून भव्य अशा पार्किंगची सोय केलेली आहे. तसेच आरोग्य विभाग रुग्णवाहीकेसह सज्ज राहणार आहे.

यावेळी शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सरपंच अरुणराव घावटे माजी सरपंच तुषार दसगुडे ,उपसरपंच बाबाजी वर्पे, माजी सरपंच नामदेव जाधव ,खजिनदार पोपटराव दसगुडे, ट्रस्टी बलदेवसिंग परदेशी,रावसाहेब घावटे, नामदेवराव घावटे ,शिरूर नगरपरिषदेचे राहुल पिसाळ, पशुवर्धन विभागाचे श्रीमंदिलकर सर ,विस्तार आधिकारी आर .आर. राठोड ,आरोग्य विभागाचे राजेश कट्टीमनी, वाहतुक शाखेचे राजेंद्र वाघमोडे उपस्थित होते.