कुर्ल्यातील वाॅर्ड क्रमांक १६७ मधून महायुतीचा उमेदवार हद्दपार 

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकेचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार करणा-या भाजप -शिवसेना महायुतीला कुर्ल्यातील वाॅर्ड क्रमांक १६७ मध्ये उमेदवारच नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे .

कुर्ला पश्चिम येथील वाॅर्ड क्रमांक १६७ हा ओबीसी महीलांसाठी राखीव आहे.या मतदार संघातून काॅग्रेस ,समाजवादी पार्टी,शिवसेना उबाठा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी तसेच अपक्ष चार असे एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत .

भाजप -शिवसेना युतीने मुंबईची सत्ता आणि मुंबईचा महापौर करण्याचा चंग बांधलेला आहे.त्यासाठी मुंबईची प्रत्येक जागा महायुतीसाठी महत्वाची असताना वाॅर्ड क्रमांक १६७ मध्ये मात्र त्यांना उमेदवारच देता न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजप शिवसेना युतीमध्ये आरपीआय आठवले , व प्रा.जोगेन्द्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष सहकारी पक्ष आहे.व या वाॅर्डातून महायुतीमधील शिवसेनेच्या सहकारी पीपल्स रिपब्लिकन पक्षाने शिवसेना शाखाप्रमुख निलेश झंजे यांच्या पत्नी शीतल झंजे या ओबीसी महीलेला उमेदवारी दिली आहे.झंजे यांनी या वाॅर्डात पदयात्रा व प्रत्यक्ष संपर्काच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रचाराची सुरूवात केलेली असतानाही त्यांना शिवसेना -भाजपने अद्याप महायुतीच्या उमेदवार म्हणून मान्यता दिली नसल्याने महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही कोणाचा प्रचार करायचा याविषयी संभ्रमात आहेत.

दरम्यान झंजे यांना महायुतीच्या उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा करावी असे पत्र शिवसेना मित्र पक्षाचे नेते प्रा.जोगेन्द्र कवाडे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले असून त्यावर अद्यापही निर्णय घेण्यात आला नसल्याचे समजते.