मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक निकालात बहुसंख्य ठिकाणी भाजप–शिवसेना महायुतीने सत्ता मिळवली आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, अहिल्यानगर आदी महापालिकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र, या सत्तेनंतर आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाकडे लागले आहे.
महापौर कोणाचा होणार, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सस्पेन्स कायम ठेवणारे वक्तव्य केले आहे. पुणे दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “वरच्या देवानेच महायुतीचा महापौर ठरवला आहे. महापौर कोण करायचा हे एकनाथ शिंदे आणि मी बसून ठरवू.”
महापौरपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेतले जाणार का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “महापौर कोण असेल, निवड कधी होईल आणि हे पद किती काळ कोणाकडे राहील, हे सर्व आम्ही दोघे बसून ठरवू. आमच्यात कोणताही वाद होणार नाही. महायुती छान पद्धतीने चालवून दाखवू.”
दरम्यान, महापौर कोणत्या पक्षाचा असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी भाजपकडून एवढेच सांगण्यात येत आहे की, मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू असेल. त्यामुळे आगामी काळात महापौरपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.