“या चिमण्यांनो, परत फिरा रे…” मुंबईच्या हितासाठी!
मुंबई: मुंबईच्या महापौरपदावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सध्या राजकीय समीकरणे प्रचंड वेगाने बदलत असून, प्रत्येक पक्ष आपापली ताकद अजमावत आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही शिवसेनेतून काही नेते बाहेर पडले, काहींनी वेगळे राजकीय मार्ग निवडले. राज ठाकरे यांनी “माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” असे म्हणत मनसेची स्थापना केली. पुढे अनेक वर्षांनंतर, कोरोनाच्या काळात प्रथमच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्याच टप्प्यावर भाजप–शिवसेना युती तुटली आणि राजकीय संघर्षाने नवे वळण घेतले.
यानंतर केंद्रातील भाजप नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरवले. शिवसेनेची फूट, दोन गटांची निर्मिती आणि त्यातून निर्माण झालेले राजकीय चित्र महाराष्ट्राने पाहिले. कोणत्या परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी ‘हीच खरी शिवसेना’ असा दावा केला, यावर भविष्यात चित्रपट निघतील, इतके ते नाट्यमय होते.
मात्र या सर्व घडामोडींमध्ये सर्वसामान्य मराठी माणूस अस्वस्थ झाला. मराठी अस्मितेचे दोन गट न्यायालयात आणि राजकारणात आमनेसामने उभे ठाकलेले पाहणे अनेकांना रुचले नाही. दिल्लीपासून “टायगर जिंदा नही है” अशा टोमण्यांपर्यंत मजल गेली आणि ही टीका केवळ शिवसेनेवर नव्हे, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि समस्त मराठी माणसांवर होती.
आज पुन्हा या आठवणी उजळण्याचे कारण म्हणजे मुंबई व परिसरातील वाढती परप्रांतीय व घुसखोरांची दादागिरी, अमराठी धनदांडग्यांचे वाढते वर्चस्व आणि झपाट्याने होत असलेल्या विकासासोबत वाढणाऱ्या सामान्य मुंबईकरांच्या समस्या.
एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. जमिनीवर राहून काम करणारा, सामान्यांसाठी धावून जाणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. ‘बहिणींचे भाऊ’ म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आणि नंतरही शिंदे हे संघटनात्मक काम करत होते, हे वास्तव आहे.
या महापालिका निवडणुकीत भाजपच्या रणनीतीने आणि देवेंद्र फडणवीसांच्या डावपेचांनी महायुतीत अंतर्गत ताण निर्माण झाला. निवडणूक निकालानंतर कमळ अधिक ताकदीने फुलले, तर इतर पक्षांची गणिते विस्कळीत झाली. अजित पवार यांनाही अपेक्षित प्रभाव दाखवता आला नाही.
“उडाले ते कावळे, राहिले ते मावळे” हा बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील संवाद आता इतिहासजमा झाला आहे. मात्र कोण का उडाले, कोण का राहिले, याचे आत्मपरीक्षण सर्वांनीच करणे गरजेचे आहे. खा. संजय राऊत यांच्या सातत्यपूर्ण आक्रमक भाषेने शिवसेनेतील दरी अधिकच वाढली, हेही नाकारता येत नाही.
मुंबईत महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला पुढे करण्यात आला असून, शिंदे गटाचे नगरसेवक थेट पाचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेत आहेत. दुसरीकडे, “परत येणार असतील तर घ्या” असा सूचक प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
२३ जानेवारीपासून बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना, मनसे आणि समविचारी भाजपविरोधी पक्षांचा एकत्रित महापौर मुंबईत व्हावा, अशी इच्छा जनमानसात व्यक्त होत आहे.
झाले-गेले बाजूला ठेवून मराठी माणसांनी पुन्हा एकत्र येणे, हीच आजच्या आणि उद्याच्या काळाची गरज आहे. ही एकजूट देव नव्हे, तर आदिशक्ती जगदंबा भवानी निश्चितच घडवेल, असा विश्वास अनेकांच्या मनात आहे.