वीज बिलात होणार मोठी वाढ

महाराष्ट्र

औरंगाबाद: राज्यातील वीजग्राहकांना वीज दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. सरासरी ७५ ते १ : ३० पैसे प्रति युनिट दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

वीज कंपन्यांची अकार्यक्षमता आणि अप्रामाणिकपणा चोरी आणि भ्रष्टाचारी कारभारामुळे वीज ग्राहकांना मात्र दर वाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज दरवाढीविरोधी आंदोलन आणि निदर्शने करावेत, असे आवाहन पत्रकात प्रताप होगाडे यांनी केले.

मार्च-2023 पर्यंत निर्णय…

महावितरण कंपनीने दरवाढ करण्याची याचिका दखल केली आहे. या याचिकेची राज्यात सहा ठिकाणी जाहीर सुनावणी होईल. त्यावर मार्च २०२३ पर्यंत निर्णय होऊन नवे दर एप्रिल महिन्यात लागू करण्यात येतील. महावितरण आणि महानिर्मितीच्या गलथान कारभारामुळे ही दरवाढ होणार असल्याचे होगाडे यांनी नमूद केले आहे.

वितरण कंपनीची अतिरिक्त वीज गळती, अदानी पॉवर कंपनी लिमिटेड कंपनीला दिला जाणारा दर फरक आणि महानिर्मिती या राज्य सरकारच्याच कंपनीकडून महागड्या दराने जाणारी वीज, या तीन प्रमुख कारणांमुळे वीज दरवाढ केली जाते.

20 हजार कोटींचा तोटा

कोरोना काळात 2020-21 व 2021-22 या दोन वर्षांत कंपनीचा 20 हजार कोटींचा तोटा झाला. तसेच, अदानी पॉवर कंपनीला 2018-19 ते 2022-23 पर्यंतचाही फरक द्यावा लागणार आहे. त्यामुळे किमान 75 पैसे ते 1 रुपये 30 पैसे प्रतियुनिट दरवाढ केली जाणार असल्याचे होगाडे म्हणाले.