रांजणगाव येथे दिवसाढवळ्या कचरा जाळण्याचा भंगार ठेकेदारांचा उद्योग सुरुच

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील स्थानिक भंगार व्यावसायिकांनी औद्योगिक वसाहतीतुन आणलेला धोकादायक कचरा कोणत्याही स्वरुपाची प्रक्रिया न करता दिवसा ढवळ्या वेळेस जाळून टाकण्याचा सपाटाच लावला असुन त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना याचा विनाकारण त्रास होत आहे. तसेच धुरामुळे आसपासच्या परीसरातील झाडे, पशुपक्षी तसेच मानवी जीवनावर याचा विपरीत परिणाम होऊ लागला असताना स्थानिक प्रशासन यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. तसेच प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीही याकडे कानाडोळा केलेला दिसत आहे.

 

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचेच भंगार गोळा करण्याचे ठेके आहेत. रांजणगाव MIDC तील अनेक कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे भंगार तसेच कचरा गोळा करुन ते कारेगाव, रांजणगाव तसेच ढोकसांगवी या परीसरातील मोकळ्या जागेत साठवले जाते. त्यात काही कचरा हा धोकादायक स्वरुपाचा असतो. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हि कंपनी किंवा संबंधित ठेकेदाराची असते. परंतु हे ठेकेदार हा धोकादायक कचरा रात्रीच्या वेळेस मोकळ्या जागी किंवा निर्जनस्थळी टाकुन पेटवून देतात. त्यामुळे प्रचंड मोठया प्रमाणात प्रदूषण होऊन आसपासच्या लोकांना त्याचा त्रास होत आहे.

रांजणगाव गणपती येथील कावळी विहीर येथे असलेला भंगार गोडाऊन मधील कचरा येथील स्थानिक ठेकेदाराने आज सकाळी 10 च्या आसपास पेटवून दिला. त्यामुळे ग्रामसेवक यांनी त्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे गेल्या अनेक दिवसांपासुन रांजणगाव परीसरात असाच धोकादायक कचरा जाळण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र यामुळे या परीसरातील जनजीवन विस्कळित होऊ लागले असुन जाळलेल्या कचऱ्याच्या धुराचा थेट पशुधन, झाडे तसेच मानवी जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. परंतु महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी मात्र अजुनही याकडे दुर्लक्ष करत आहेत. यावर येथील ग्रामपंचायत सदस्य प्रताप फंड यांनी आवाज उठवला होता. परंतु अजुनही हे भंगार ठेकेदार दिवसाढवळ्या कचरा जाळत असल्याने त्यांना प्रशासनाकडुन अभय मिळत असल्याची सगळीकडे चर्चा आहे. त्यामुळे जर ग्रामपंचायत सदस्य यांनी तक्रार करुन त्याची तातडीने दखल घेतली जात नसेल तर सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी कोण ऐकून घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.