छ. संभाजीनगरात पुन्हा कोरोना; तीन दिवसात आढळले 15 रुग्ण! संशयितांच्या चाचण्या सुरु…

महाराष्ट्र

औरंगाबाद: सध्या शहरात कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या एच-३ एन-२ संसर्गाचेही रुग्ण शहरात आढळून येत आहेत. महापालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रावर आरटीपीसीआर व अँटिजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली. दररोज संशयित रुग्णांची टेस्ट करण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. मागील दोन-तीन दिवसांत केलेल्या अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्टमधून १५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यातील दोन केसेस या ग्रामीण भागातील असून १३ जण शहराच्या विविध भागांतील आहेत.

कोरोना आणि एच-३ एन-२ ची लक्षणे सारखीच

कोरोना, एच-३ एन-२ आणि स्वाइन फ्ल्यू या तिन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोरोना टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.

ताप अंगावर काढू नका; आरोग्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

आरोग्यमंत्री सावंत यांनी नागरिकांना ताप अंगावर न काढण्याची सूचना दिली आहे. तसंच राज्यातल्या रुग्णांच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. सावंत म्हणाले, “१२ मार्चला राज्यात ३५२ रुग्ण आहेत. परीक्षा संपल्यावर मित्रांसोबत फिरायला आलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलेलं, रात्री १२ वाजता त्याचा मृत्यू झाला. नागपूरमधल्या एका इसमाचाही मृत्यू झाला आहे. H3N2 ने लगेच मृत्यू होत नाही, उपचार घेतला तर तो रुग्ण बरा होतो.”

घाटीत तपासणी

बाधितांसाठी एकच आरटीपीसीआर टेस्ट आहे. या टेस्टद्वारे घाटीतील लॅबमध्ये कोरोना, एच-३ एन-२ आणि स्वाइन फ्ल्यू या आजारांची एकाच वेळी टेस्ट केली जात असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.