गद्दार निवडणुकीला सामोरे जायला घाबरतायत: आदित्य ठाकरे

महाराष्ट्र

मुंबई (शीतल करदेकर): शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वांद्रे पश्चिम इथल्या 3 शाखांचं उद्घाटन केलं. उद्घाटन प्रसंगी आयोजित रोड शो ला हजारो शिवसैनिक आणि वांद्रेकरांनी उपस्थिती लावली होती. वांद्र्यात आदित्य ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी जागोजागी भगवे ध्वज, ढोल ताशा आणि २५ फुटांचा हार बांधण्यात आला होता.

यावेळी बोलताना “या शाखेचे उद्घाटन करताना मला खरंच आनंद होतोय कारण शाखा ही आपल्या शिवसेनेची जीवनवाहिनी आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचं मदत केंद्र आहे. अनेक राजकीय पक्ष सध्या मैदानात उतरत आहेत मुंबई सगळ्यांना आठवायला लागलीय. मुंबई आम्ही जिंकणार, मुंबईचा महापौर आमचाच होणार” अशी स्वप्न पडायला लागल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले .

मुंबई महापालिकेच्या निवडणूक सध्या लांबणीवर पडल्या आहेत. या विषयी बोलताना “गद्दार निवडणूक घ्यायला घाबरत आहेत कारण त्यांना ठाऊक आहे जनमत उद्धव साहेबांसोबत आहे. आपण हारणार हे त्यांना ठाऊक आहे आणि म्हणून ते निवडणूक घ्यायला घाबरत आहेत. त्यांच्या हृदयात धडकी भरलीय. पण आपण जिंकणारच.” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजप मुंबईकडे मलई म्हणून बघतय

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना आदित्य ठाकरे म्हणाले “तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्या प्रत्येक विधानात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे असं म्हटलं जातंय. त्यांचा डोळा कशावर आहे हे जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी, सत्ता केंद्र असेल. तरी देखील मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. हे आपल्याला विसरुन चालणार नाही

गेल्या 25 वर्षात मुंबईत आपण अनेक काम केली आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री काही दिवसांपूर्वीच म्हणाले मुंबईची हंडी आम्हीच फोडणार, पण त्यांचं लक्ष मलईवरच आहे. मुंबई त्यांच्यासाठी मलाही असेल पण आपल्यासाठी मुंबई आपलं प्रेरणास्थान आहे, आपलं मंदिर हे मुंबई आहे. आपली कर्मभूमी आणि जन्मभूमी ही मुंबईच आहे .”