कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रावरून न हलण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे बोलताना त्यांनी म्हटलं की, “मी हात जोडून विनंती करते की कोणत्याही ‘व्होटिंग एजंट’ने मतमोजणी केंद्र सोडू नये. ही भाजपाची योजना आहे. निवडणूक आयोग आधी त्यांचे निकाल जाहीर करेल आणि त्यानंतर आमचे निकाल जाहीर करेल, हे मी कालपासून सांगत आहे.”
ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर आरोप करत सांगितले की, सुमारे १०० ठिकाणी २-३ फेऱ्यांनंतर मोजणी थांबवण्यात आली आहे. कल्याणी येथे मोजणी न झालेले काही ईव्हीएम मशीन सापडल्याचाही त्यांनी दावा केला.
तसेच त्यांनी केंद्रीय सुरक्षा दलांवर आणि प्रशासनावरही टीका केली. “केंद्रीय दल तृणमूल काँग्रेसवर अत्याचार करत आहेत. आमच्या कार्यालयांवर ताबा घेण्याचे प्रकार घडत आहेत. निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांच्यात संगनमत असल्याचा संशय आहे,” असे त्या म्हणाल्या.
कार्यकर्त्यांना धीर देताना त्या पुढे म्हणाल्या, “दुःखी होण्याची गरज नाही. अजून केवळ ३-४ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. १४-१८ फेऱ्यांनंतर चित्र बदलेल. आम्ही अजूनही अनेक जागांवर आघाडीवर आहोत. आपण वाघासारखे लढत राहू.”सध्याच्या कलानुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजपा सुमारे १९२ जागांवर आघाडीवर असून तृणमूल काँग्रेस ९६ जागांवर पुढे असल्याचे चित्र दिसत आहे.