इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

महाराष्ट्र

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती देण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पाहणी दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.

महाविद्यालयातील पायाभूत सुविधांचा विस्तार, इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण, क्रीडा संकुलाची उभारणी, विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचे बांधकाम आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. प्रलंबित विकासकामांचे प्रस्ताव मार्गी लावून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

विद्यार्थिनींच्या निवासाची वाढती गरज लक्षात घेता, ३२० विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या नवीन वसतिगृहासाठी सुधारित आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना सुरक्षित आणि सुविधायुक्त निवासव्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

महाविद्यालय परिसरात १५० फूट उंचीचा भव्य राष्ट्रध्वज उभारण्याच्या प्रस्तावाचाही आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर महाविद्यालयातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या दौऱ्यादरम्यान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविद्यालयाच्या उपाहारगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत नाश्ता केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व सुविधांबाबत माहिती घेतली. उपाहारगृहात विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि स्वच्छ नाश्ता मिळावा, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना केल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी खासदार रवींद्र वायकर, आमदार अनंत (बाळा) नर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, सहसंचालक रुपेश राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत