कोल्हापूर: कोल्हापुरामध्ये दोन गटांत वाद होता. पोलिसांनी वाद नियंत्रणात आणलेला आहे; पण ज्यांनी दंगली घडविली, त्या सर्वांवर कारवाई होणार, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना दिला.
भाजप जातीय दंगली घडवून आणत आहे, या विरोधकांच्या टीकेला त्यांनी उत्तर द्यायचे टाळले. विरोधकांना काही कामधंदा उरलेला नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न विचारून माझा वेळ कशाला वाया घालवता, अशी टिप्पणी करत त्यांनी विरोधकांच्या टीकेला टोलवले.
सिद्धार्थनगर चौकात मंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यावरून झालेल्या वादानंतर फलकाची, झेंड्याची विटंबना झाल्याच्या समजातून दोन गटांत दगडफेकीचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला होता. वाहनांची तोडफोड, जाळपोळ, दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी आज ४०० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. दोन्ही गटांतील ३१ जणांची नावे निष्पन्न झाली.दरम्यान, दुसऱ्या दिवशीही सिद्धार्थनगर, राजेबागस्वार परिसरात तणाव कायम होता. दिवसभर अधिकाऱ्यांसह पोलिस बंदोबस्तही तैनात होता.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आसिफ शेख, शाहरूख शेख, कौशिक पटवेगार, सोहेल पटवेगार, तऩ्वीर मुजावर, नौशाद मुजावर, शाहरूख रिक्षावाला, तौसिफ शेख, अब्दुलरौफ सिद्धीकी, अश्पाक गॅसवाला, जबीर इनामदार, सोहेल शेख, समीर मिस्त्री, परवीन शेख, आश्रफ सिद्धीकी, इजाज शेख, साहील हाकीम, परहाज नायकवडी, इकबाल सरकवास, बिलाल शेख, मुन्ना सिद्धीकी तसेच सिद्धार्थनगरातील सूरज कांबळे, अभिजित कांबळे, शुभम कांबळे, विजय पटकारे, महेश कांबळे, लखन कांबळे, गणेश कांबळे आदींचा समावेश आहे.
राजेबागस्वार दर्गा परिसरातील भारत तरुण मंडळाचा वर्धापन दिन १५ ऑगस्टला साजरा केला जाणार होता; मात्र त्यावेळी बाजूलाच सर्किट बेंच उद्घाटनाची तयारी सुरू असल्याने पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यामुळे कार्यकर्त्यांनी २२ ऑगस्टला वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरवून सिद्धार्थनगर कमानीसमोर साऊंड सिस्टीम उभी केली होती. मुख्य मार्गच अडविण्यात आल्याने लक्ष्मीपुरी पोलिसांनी याठिकाणी पोहोचून साऊंड सिस्टीम हटविण्यास सांगितले.
तक्रार केल्याचा गैरसमज….
साऊंड सिस्टीमबाबत सिद्धार्थनगरातील लोकांनी तक्रार केल्याचा गैरसमज भारत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी करून घेतला. राजेबागस्वार दर्गा परिसरातील तरुणांनी ईर्ष्येतून रात्री नऊच्या सुमारास सिद्धार्थनगर कमानीसमोर साऊंड सिस्टीम वाजवत फटाकेही फोडले. याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या सिद्धार्थनगरातील तरुणांसोबत वाद होऊन दगडफेकीला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीत पाच स्थानिक जखमी झाले तर दोन पोलिसांनाही दुखापत झाली होती.
पोलिसांचे धाडस….
दगडफेकीची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर उपलब्ध पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या मदतीला स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकरही पथकासोबत आले. यावेळीही किरकोळ दगडफेक सुरूच होती. दोन्ही बाजूंचा जमाव मिळून तीन ते चार हजार लोक रस्त्यावर असूनही पंधरा ते वीस पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. मुख्यालयाकडील पोलिस फौजफाटा येईपर्यंत या पथकाने जमावाचा सामना केला.
रात्रभर पोलिस तैनात….
पोलिसांना मध्यरात्री दीडच्या सुमारास वाद पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. लक्ष्मीपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण, शहरातील चारही पोलिस ठाण्यांकडील पोलिस व मुख्यालयातील राखीव पोलिसांचा बंदोबस्त सिद्धार्थनगर चौकात तैनात होता. पहाटे या पोलिसांची ड्यूटी बदलून बदली कर्मचारी तैनात करण्यात आले.
वर्दळ कमी, तणाव कायम…
सिद्धार्थनगर चौकासह भागात सकाळपासून तणावपूर्ण वातावरण होते. अनेकजण आपापल्या घरांसमोर थांबून चर्चा करीत होते. वाहनांची गर्दीही तुरळक होती. अनेकजण आपले वाहन, दुकान यांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी पोहोचले. चौकात थांबणाऱ्या वाहनांचे मालक अन्यत्र राहण्यास असून, रात्री दंगा सुरू असल्याने इकडे येण्याचे टाळलेले अनेकजण सकाळी आले होते. जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ, भाऊसिंगजी रोड, दसरा चौक परिसरात ठिकठिकाणी थांबून या घटनेची चर्चा करणारे लोक नजरेस पडत होते.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, गृह उपअधीक्षक तानाजी सावंत, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक संतोष डोके, सुशांत चव्हाण, संजीव झाडे रात्री उशिरापर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सकाळी पुन्हा अधिकाऱ्यांनी येऊन दोन्ही बाजूच्या लोकांशी संवाद साधला. विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही दोन्ही ठिकाणी भेटी देऊन लोकांसोबत चर्चा केली.