५०० रुपयांच्या १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या?

महाराष्ट्र

मुंबई: मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आता आणखी एक घोटाळा उघड झाला असून २०१६-१७ या वर्षात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आला परंतु आरबीआयकडे ७२५० दसलक्ष नोटाच पोहचल्या म्हणजेच ८८ हजार कोटी रुपये मुल्य असलेल्या १७६ कोटी नोटा गायब झाल्याची माहिती उघड झाली आहे. या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, नाशिक, देवास आणि बंगलुरुच्या सरकारी छापखान्यात नोटा छापल्या जातात. नाशिक व देवास येथील नोटा छापणारे सरकारी छापखाने केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारित येतात. सरकारी छापखान्यातून थेट रिझर्व्ह बँकेकडे जातात व नंतर बाजारात चलनात येतात, ही प्रक्रिया आहे. मग या नवीन ५०० रुपयांच्या नोटा गायब कशा झाल्या? या कारखान्यात छापलेल्या नवीन ५०० रुपयांच्या नोटांमध्ये घोटाळा झाला असून तब्बल ८८ हजार कोटी रुपये गेले कुठे? हा गंभीर प्रश्न आहे.

राहुल गांधी यांनी नोटबंदी हा सर्वात मोठा घोटाळा आहे असे आधीच सांगितलेले आहे. नोटबंदी जाहीर केल्यानंतर ५०० व १००० रुपयांच्या जुना नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आल्या होत्या. १६६० कोटी नोटा चलनात होत्या पण रिझर्व्ह बँकेत या जुन्या नोटा जमा झाल्या त्यावेळी २ लाख कोटी नोटा जास्तीच्या जमा झाल्या होत्या, अशी माहिती आहे. नोटबंदीनंतर नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटा किती छापण्यात आल्या? रिझर्व्ह बँकेकडे यातील किती नोटा पोहचल्या? यासह जुन्या नोटांच्या घोटाळ्याचीही चौकशी झाली पाहिजे.

आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालावी

आदिपुरुष चित्रटातून श्रीराम व हनुमान यांचा अपमान करण्यात आला आहे. भाजपा हिंदुत्वाचे सरकार असल्याचा डांगोरा पिटते आणि श्रीराम व हनुमानाचा अपमान करणारा चित्रपट येतो पण त्यावर भाजपा काहीच बोलत नाही. हनुमानाच्या तोंडी टपोरी संवाद देण्यात आले आहेत. चित्रपटाच्या नावाखाली कार्टून बनवले आहे. सेंसॉर बोर्ड काय झोपा काढत होता काय? श्रीराम व हनुमानाचा अपमान करणाऱ्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. श्रीराम व हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंद घालावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.