राहुल गांधी’ असणं खरंच सोपं नाही; संजय आवटे

महाराष्ट्र

मुंबई: वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सख्ख्या काकाचा मृत्यू तुम्ही पाहाता. लाडक्या आजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो, तेव्हा तुम्ही उण्यापु-या चौदा वर्षांचे असता. एकविसाव्या वर्षी वडिलांच्या शरीराच्या झालेल्या चिंधड्या तुम्हाला दिसतात. तरीही, तुम्ही विचलित तर होत नाहीच. उलट, वडिलांच्या मारेक-यांना माफ करता. आई-वडिलांचा प्रेमविवाह. आई मूळची वेगळ्या देशाची. म्हणून, असभ्य, अश्लील भाषेत तिच्यावर रोज टीका केली जाते. अगदी खालच्या पातळीवरची, घाणेरडी भाषा वापरली जाते.

आईच्या चारित्र्यावर चिखलफेक होते. ‘कुजबुज कॅम्पेन’ चालवले जाते. तरीही, तुमच्या मनात सुडाची भावना निर्माण होत नाही. देशाची सगळी सत्ता ताब्यात आल्यानंतरही, तुम्ही त्या सत्तेत मश्गुल होत नाही. शिवाय, या अशा लोकांना वेचून-वेचून मारणं तर सोडाच, प्रेमाशिवाय अन्य भाषा तुमच्या ओठी येत नाही.तुमचा धर्म कोणता, आईचा धर्म कोणता, आजोबा- पणजोबांचा धर्म कोणता, यावरून एवढा त्रास दिला गेला, तरी तुमच्या मनात कटुता निर्माण होत नाही. धर्मनिरपेक्षतेबद्दची तुमची मांडणी ओसरत नाही. भाषेचा स्तर घसरत नाही.

कॉंग्रेस सत्तेत असताना तुमची आई राजकारणाच्या रिंगणाकडं फिरकत नाही, पण कॉंग्रेसची स्थिती बिकट झालेली असताना मात्र ती पदर खोचून उभी राहाते. तेव्हा, जे तिच्या वाट्याला येतं, ते सारं तर तुम्हीही सोसत असता. तरी संताप संताप होत नाही. राजकारणात उतरल्यानंतर ‘ते’ तुम्हाला ‘पप्पू’ करून टाकतात. सगळं जग तुमच्यावर तुटून पडतं. तुमची यथेच्छ बदनामी केली जाते. ट्रोलिंगचा अक्षरशः कहर होतो. रोजचे जगणे अवघड व्हावे, एवढा छळ होतो. तरीही तुम्ही निराश होत नाही, विफल होत नाही. ज्यांनी ट्रोल केले, त्यांचे तुम्ही जाहीर आभार मानता आणि विखार हीच मातृभाषा ज्यांची, त्यांनाही मिठी मारता.

सगळं होत्याचं नव्हतं होतं. पक्षाची पडझड सुरूच राहाते. पक्ष आता उभारी घेणार नाही, असे पर्सेप्शन तयार केले जाते. सोबत असलेले सोडून जातात. मूर्खातले मूर्खही तुमच्यावर हसू लागतात. माध्यमे तुम्हाला बदनाम करण्याची प्रत्येक संधी घेत असतात. ‘देशद्रोही’ अशी प्रमाणपत्रे वाटणारे कारखाने वाढत जातात. तरीही, तुम्ही मैदान सोडत नाही. ‘आयडिया ऑफ इंडिया’साठी रान पेटवणं थांबवत नाही. निवडणुकातले जय- पराजय, सत्तेची समीकरणं यात सगळे गुंतलेले असताना, हा व्यापक लढा तुम्ही सोडत नाही. अगदी जवळचे दुरावतात, भलेभले साथ सोडतात, तरी तुमची जिगर कमी होत नाही. आज अशा साध्या माणसासाठी तुम्ही झगडताना दिसता, ज्याला या व्यवस्थेत काही आवाज नाही. तुम्ही मैलोनमैल झपझप चालत राहता आणि त्या भारताशी बोलत असता, जो कधी टीव्हीच्या पडद्यावर उमटत नाही.

खासदारकी जाते, घर जाते… सारे हिरावून घेतले जाते, तरी तुमच्या चेह-यावरचं ‘मिलियन डॉलर स्माइल’ ओसरत नाही. कशी करू शकता तुम्ही अविरत अशी प्रेमाची भाषा? कशी जगू शकता अशी ‘आयडिया ऑफ इंडिया’? आयुष्यभर हिंसा सोसूनही, कशी सांगू शकता अहिंसा? राहुल गांधी, तुम्ही ५३ वर्षांचे झालेले असताना, आज तरी हे धीरोदात्त गुपित आम्हाला सांगाच. जिथं, सुडापोटी माणसं माणसांचे खून करतात. खुल्या अभिव्यक्तीचे सगळे मार्ग बंद केले जातात. धर्माच्या उन्मादातून कोणाला ठेचून मारतात. सातत्यानं होणा-या अवमानामुळं, अपयशामुळं माणसं आत्महत्या करतात. अशावेळी तुमच्यात हे सगळं येतं कुठून? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सापडत नाही. ‘राहुल गांधी’ असणं खरंच सोपं नाही.